एमव्हीटीव्ही पतपेढी विषयी
पूर्वापारपासून मुंबई हे व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र. अठरापगड जातीची, धर्माची आणि राज्यातली लोकं मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त येतात आणि इथेच स्थिरावतात. महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. पण खासकरून कोकणातल्या लोकांना मुंबईचा खास जिव्हाळा. कोकणातून बोटीत बसून यायचं आणि भाऊच्या धक्क्यावरून या महानगरीत पाऊल ठेवायचं. इथं आपली स्वप्न साकार करायची. हे वर्षानुवर्षं चालत आलंय.
मुंबईत गिरण्यांची चलती होती तेव्हा अनेक मराठी माणसं इथं येऊन दादर, गिरगांव, प्रभादेवी, इत्यादी ठिकाणी वसली. दिवसभर कष्ट करायचे आणि संध्याकाळ मित्रमंडळींसोबत गप्पा मारत घालवायची, असा यांचा दिनक्रम असायचा. याच लोकांना आवश्यक तो किराणा माल, कापडचोपड, विडी-तंबाखू, इत्यादी माल पुरवण्यासाठी छोटी छोटी दुकानं उदयास आली. रत्नागिरी जिल्ह्यातली असंख्य कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही दुकानं चालवत आहेत. पुढं त्यांनी आपल्या नातलगांना, कुटुंबियांनाही इथं आणलं. मग वेगवेगळा माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे संघ तयार झाले. त्यात विडी, तंबाखू आदी गोष्टींचा व्यापार करणारेही एकत्र आले. हे सगळं असलं तरी दुकानं छोटी छोटीच. त्यात बऱ्याचदा उधारीही असायची. भांडवलाची चणचण भासायची. याच दरम्यान दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस तसेच आदरणीय श्री. शरदराव पवार यांची या मंडळींची गाठ पडली. त्यांच्या सूचनेनुसार एका पतपेढीची उभारणी करण्याचं ठरवलं. ही गोष्ट 1979 सालची. मुंबईतल्या विडी-तंबाखूच्या व्यापाऱ्यांच्या हक्काची आपली पतपेढी म्हणून नाव ठरलं – मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई. बस हीच आपली MVTV पतपेढी.
तेव्हापासून आजपर्यंत आपली ही MVTV पतपेढी वेगाने प्रगती करत आहे. आज संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. मुंबईनं अनेक स्थित्यंतरं पाहीली, आघात पचवले पण पुन्हा सावरली. किंबहुना पुन:पुन्हा सावरणे हेच तर मुंबईचे बलस्थान आहे आणि हीच ओळख आहे MVTV पतपेढीची. अनेक आव्हानं परतवून लावत ही पतपेढी आजही दिमाखात उभी आहे.
सुरूवातील प्रभादेवी इथं MVTV पतपेढीची सुरूवात झाली. अनेक वर्षे ही एकच शाखा होती. परंतु, गेल्या काही वर्षात आधी डोंबिवली आणि मग गोरेगांव अशा दोन शाखा झाल्या. आता MVTV पतपेढीच्या एकूण तीन शाखा आहेत. भारंभार शाखाविस्तार करून जबाबदाऱ्या वाढवण्यापेक्षा व्यवसाय वाढवण्यावर आपल्या पतसंस्थेनं भर दिला आहे. म्हणूनच एखाद्या छोट्या सहकारी बँकेपेक्षा जास्त व्यवसाय या पतपेढीतून होतो. यासाठी अत्यंत वेगवान निर्णय, पद्धतशीर नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी यावर संस्थेचा भर असतो. म्हणूनच तर संस्थेकडील ठेवी या कर्जापेक्षा अधिक असतात. त्याचबरोबर आपल्या पतपेढीला ऑडिटिंमध्ये सतत अ वर्ग प्राप्त होतो. संस्थेची सभासदसंख्या ३०००० हून अधिक आहे. यात नोकरदार व व्यापारी अशा दोन्हींचाही समावेश आहे. आपल्या शाखा जरी तीनच ठिकाणी असल्या तरी आपला ग्राहकवर्ग तळकोकण ते कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, असा विस्तृत आहे. संस्थेच्या कर्मचारी वर्गात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने रोजगार निर्मितीमध्येही MVTV पतपेढी कार्यरत आहे.
बदलत्या काळानुसार MVTV पतपेढीनं आपल्या कार्यपद्धतीमध्येही सुधारणा केल्या आहेत. आपल्या प्रत्येक शाखेची रचना व रंगसंगती एकसारखी असते. संस्थेचे सर्व व्यवहार खूप पूर्वीच कंप्युटराईज्ड झालेल्या आहेत. ग्राहकांच्या गरजा ओळखून सातत्याने MVTV पतपेढी आपल्या सेवेमध्ये बदल करत असते. ठेवी तसेच कर्जांच्या विविध योजना सुरू करणे, विविध उत्सव-सण उत्साहात साजरे करणे आणि त्यात ग्राहकांना सामावून घेणे अशा विविध गोष्टी संस्थेतर्फे केल्या जातात. तरूण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांतही आपली पतपेढी सक्रिय आहे.
प्रगतीपूरक अर्थसेवा हे ब्रीद घेऊन येणाऱ्या काळात संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारणे आणि MVTV पतपेढीचा व्यवसाय अधिकाधिक वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा प्रदान करणं ही उद्दिष्टे ठेवून संस्था कार्यरत आणि कटिबद्ध आहे.